आज ‘विज्ञानदिन’आहे . आज विज्ञानामुळे जग कुठल्याकुठे पोहचले आहे. जगात सगळीकडेच नैसर्गिक आपत्ती,आजारपण,जन्म-मृत्यू याबद्दल भ्रामक कल्पना होत्या पण जसजसे शोध लागत गेले मानवी जीवन सुकर होत गेले.पूर्वी प्लेग,पटकी,देवी याने गावेच्या गावे ओस पडत होती अन त्याला देवाचा कोप म्हटले जायचे पण विज्ञानाच्या शोधाणे कळले कि ते संसर्गजन्य आजार आहेत.........अन असे बरेच मानवाला जीवन जगण्यास उपयोगी शोध लागले. आता तर आपण चंद्रावर पोहोचलो,मंगळावर पोहोचलो.मानवी जीवन सुखकर बनवतानाच विज्ञानाचा गैर वापरही केला जातोय.होरीशिमा नागासकी अणुबॉम्ब युद्ध..इराण-इराक युद्ध.असे भयानक परिणामही समोर आले आहेत.
परंतु संपूर्ण मानव जातीला फायदा होईल असे तंत्रज्ञान हवे ज्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल. याचे एक महत्वाचे उदहारण देता येईल, काही वर्षापूर्वी लॅपटॉप हा २ हजार डॉलरला मिळायचा. त्यामुळे तो एका विशिष्ट वर्गासाठीच र्मयादित होता. तो २00 डॉलरमध्ये मिळेल का, असे आव्हान ‘न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लिडरशीप इनोव्हेशन’ या योजनेच्या माध्यमातून आम्ही केले होते. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन विनय देशपांडे यांनी २00 डॉलरमध्ये लॅपटॉप बनविला आणि तो बाजारात आला. त्यातून प्रेरणा घेवून ‘आकाश’ हा टॅबलेट बनविता आला. ज्याची किंमत अवघी ३५ डॉलर आहे. या अविश्वसनीय संशोधनामुळे आता स्वप्न मांडता येईल की, प्रत्येक शाळकरी मुलाकडे टॅब असेल आणि तो वहया-पुस्तकांचे ओझे वाहणार नाही. त्याला ते सगळे, इंटरनेट एक्सेस टॅबवर मिळेल. त्यामुळे तो संपूूर्ण जगाशी, जागतिक ज्ञानाशी जोडला जाईल. प्रत्येक मुलाला टॅब मिळाला तर शिक्षणात एक मोठी क्रांती होईल. २ हजार डॉलरचा लॅपटॉप २00 डॉलरमध्ये आणणे जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य वाटले नव्हते. पण ते भारताने करून दाखविले. नागरिकांना फायदा होईल, त्यांच्या रोजच्या जगण्यात त्याचा वापर होईल असेच संशोधन होणे आवश्यक आहे.
जगाकडे पाहिले तर तंत्रज्ञानाचा झालेला विकास आणि त्याच्या वाढलेल्या वापरामुळे o्रीमंत आणि गरीबांमधील दरी वाढत जाते. ही दरी कमी करायची असेल तर वेगळे मार्ग शोधायला हवेत. त्यासाठी संशोधन करीत असताना कंपन्या ‘मोअर द्यान मोअर’ असे म्हणतात. म्हणजेच, जास्त पैसे द्या तुम्हाला जास्त विकसीत तंत्रज्ञान देतो, असे कंपन्या ग्राहकांना सांगतात. तर दुसरीकडे गरीबांसाठी ‘लेस द्यान लेस’ हे तंत्र कंपन्या अवलंबितात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावरची वाहतूक पाहिली तर असे दिसून येते की श्रीमंत व्यक्ती र्मसिडिझसारख्या महागडया गाडया वापरतात तर गरीब व्यक्ती सायकल नाही. पण हे चित्र बदलण्याचे टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ठरविले आणि त्यांनी ते बदलले सुध्दा. गरीबांना स्कूटरच्या किंमतीत चारचाकी गाडी देता येईल ज्यामध्ये सोयी-सुविधा, सुरक्षितता यात कोणतीही तडजोड केलेली नसेल, असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते ‘नॅनो’च्या माध्यमातून प्रत्यक्षातही उतरविले. हा एक मोठा बदल आहे.जगभर ‘मोअर द्यान मोअर’ हे तंत्र वापरले जात असताना त्यास टाटा यांनी ‘मोअर द्यान लेस’ हे उत्तर दिले. हे कशातून शक्य झाले तर ते ‘सायन्स-टेक्नॉलॉजी-इनोव्हेशन’ यातूनच शक्य झाले. विज्ञानातून तंत्रज्ञान बनते आणि तंत्रज्ञानातून नवकल्पकता येते.श्रीमंत-गरीबांतील दरी कमी करायची असेल तर ‘मोअर द्यान लेस’ हे तंत्र आता वापरणे काळाची गरज बनली आहे. तुम्ही केवळ गरीब आहात म्हणून तुम्हाला अति उच्च तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येणार नाही, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. नवनव्या तंत्रज्ञानापर्यंत सगळयांना पोहचता यायला हवे. यातूनच समानता येईल. हा बदल थोडया प्रमाणात दिसू लागला आहे.
मिश्किन या शास्त्रज्ञाने केलेले संशोधन खरोखरच उल्लेखनिय आहे. तो म्हणाला, ‘कर्करोगाने लोक मरतात हे मला पटते पण अँनिमियाने लोक का मरतात?’ हा विचार करीत असताना त्याला दिसून आले की. हिमोग्लोबिनची तपासणी करण्यासाठी २00 रूपये लागतात. पण अनेकांकडे एवढे पैसेच नसतात. त्यामुळे ही तपासणी होत नाही आणि त्यांना आपले रक्त कमी झाले आहे, हे समजतच नाही. जर २00 रूपयांची तपासणी आपण १0 रूपयांमध्ये देऊ शकलो आणि ते ही इंजेक्शनच्या वापराशिवाय, टोचून रक्त काढण्याशिवाय तर.. या विचारातूनच मिश्किनने संशोधन केले आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे एक यंत्र तयार केले जे फक्त बोटाच्या बाजुला फिरवताच त्या व्यक्तीची हिमोग्लोबिनची पातळी किती आहे हे सांगेल आणि ते ही अवघ्या १0 रूपयांमध्ये! या अद्भूत तंत्रज्ञानामुळे खेडयापाडयात राहणार्या लोकांना मोठी मदत होईल. त्यांना आपले रक्त कमी झाल्याचे घरच्या घरीच कळू शकेल. अशी संशोधने व्हायला हवीत. अशा ज्ञानाची, तंत्रज्ञानाची भारतालाच नव्हे तर जगाला आवश्यकता आहे.
आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत. जशी कि,आरोग्य,हवा,पाणी,अन्नप्रदूषण,पिण्याचेपाणी,दळणवळण,शिक्षण,अंधश्रद्धा,अज्ञान,गरिबी,त्यावर विज्ञान-तंत्रज्ञानातून उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
त्यातील एक म्हणजे प्रत्येकाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे. देशात ‘राईट टू एज्युकेशन’चा कायदा तर आला. पण अजूनही प्रत्येकाला योग्य शिक्षण मिळू शकलेले नाही. ते ‘राईट एज्युकेशन’ कधी मिळणार हा यक्ष प्रश्न आहे. तसेच आरोग्याचा एक महत्वाचा प्रश्न वर्षानुवष्रे दुर्लक्षित राहिला आहे. आजही गावांमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आजारी व्यक्तींना खेडेगावातून शहर, तालुका पातळीवर उपचारासाठी यावे लागते. २५ ते ५0 हजार लोकांमागे एक डॉक्टर असे चित्र आहे.
दळणवळणाचा मोठा प्रश्न देशासमोर आहे. खूप मोठया लोकसंख्येची वाहतूक (मास ट्रान्सपोर्ट) ही योजना व्यापक प्रमाणात राबविण्याची गरज आहे. पर्यावरण वाचवायचे असेल तर प्रत्येकाकडे कार असून उपयोग नाही तर सार्वजनिक वाहतूक सक्षम बनवायला हवी.
संशोधन सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजाची
शास्त्रज्ञ अनेक संशोधन करतात पण ते सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजाची, पूर्ण देशाची आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) व इतर प्रयोगशाळांमधून शास्त्रज्ञ नवे संशोधन करतात पण ते पुढे नेण्याचे काम सरकारचे आहे. पण ते तेवढया रेटयाने पुढे नेले जात नाही. हे एक मोठे दु:ख आहे. एनसीएलमध्ये पाणी स्वच्छ करण्याचे एक तंत्रज्ञान निर्माण करण्यात आले. त्याला अमेरिकेचे पेटन्टही मिळाले. या तंत्रज्ञानाने पाण्यातील जिवाणू तर मारले जातातच त्याचबरोबर विषाणूही मारले जातात. हे तंत्रज्ञान एका कंपनीने पुढे नेले. त्याचबरोबर हॅन्ड ऑपरेटर सिस्टीमही तयार केली. जी वीज नसतनाही पाणी स्वच्छ करू शकते. यासाठी ‘जलदूत’ नावाची एक तीनचाकी गाडी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ेय २0 हजार लिटर पाणी शुदध होते तेही अवघ्या १५ पैसे प्रति लिटर दराने. यासाठी वीजेचीही आवश्यकता नाही. गाडी चालवतानाच हे पाणी शुध्द होते. या प्रकल्पाने गावांमध्ये रोजगारही निर्माण केला आहे. गावातील ७0-८0 टक्के स्त्रीयांना रोजगार मिळाला आहे.
हे चित्र बदलण्यासाठी आणि तरूणांनी संशोधनाकडे वळण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करायला हवेत. शालेय जिवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावायला हवी. मोठेपणी वैज्ञानिक होवून पैसे कमविणार, ही वृत्ती निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. नवे संशोधन करताना ते समाजउपयोगी पडणारे हवे आणि मानसिक समाधान देणारे असायला हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा